Tuesday, June 11, 2013

ती सर माझी होती. (Ti Sar Majhi Hoti)



ती सर माझी होती.

काळ्याभोर  ढगांमधुन
कोसळणारा प्रत्येक थेंब,
आतुरतेने कापत होता रस्ता.

निमिषाच्या विध्युत्प्रकाशात
बहुदा, तो शोधत असावा मला.

बेभान  वाऱ्याशी त्याने,
केली होती गट्टी.
अलगद माझ्यापर्यंत पोहोचवायचं,
झालं होतं नक्की.

कोसळला पाउस,
वाऱ्याला आलं उधाण.
चिंब  चिंब झाली माती,
पानं-फुलं ही  बेभान.

मग कौलावर माझ्या,
जेव्हा पडली पहिली थाप.
मोहरून गेलं मन,
हे  ही पावसाचेच प्रताप!

तो डोकावला खिडकीतून,
जरासा चोरुन.
घट्ट मिटले मी डोळे,
घेतली कवाडे लावुन.

ज्या  सरीसाठी होती,
घट्ट घट्ट अशी मिठी.
त्या वेडीला केलं मी,
किती दुखी-कष्टी.

तरीही ती मुसळधार,
बरसत राहिली खंबीर.
रडून झाली वेडीपिशी.
मी तरीही गंभीर.

खिडकीपाशी गेले मी,
तिची समजुत काढायला.
पलीकडे ओघळणाऱ्या थेंबांना
ओंजळीत धरायला.

पण थेंब मात्रं ओघळत रहिले.
कोसळत राहिली सर.
ओंजळ राहिली रीती.
पण भिजुन गेले मन.

ओल्या कडा पुसून,
मी पलीकडे पहिले.
एका वाटसरुने तिला,
होते मिठीत घेतले.

चिंब झाला वाटसरु,
तृप्त झाली होती सर.
बांध फुटले गेले सारे,
फुटला मायेचा पाझर.

नखशिखांत न्हालेला तो, आणि
आठवणींच्या वादळात सापडलेली मी.
दोघेही ओलेचिंब, तरीही एक फरक -
एका सरीचा, खोल-खोल दरीचा.

आता ती सर माझी राहिली नव्हती.
ती त्याची होती.
त्याचाच पाउस, त्याचेच थेंब,
त्याचेच ओल्या मातीचे कण,
त्याचाच भिजलेला प्रत्येक क्षण.

डोळ्यांच्या  कडा परत पाणावल्या.
पण ह्यावेळी सरसावले नाही हात.
गालांवरून अश्रु  ओघळत राहिले,
आणि वेडं मन गालात हसुन म्हणालं,
"कदाचित ती सर माझी कधीच नव्हती."

मात्रं, सरीचे अश्रु कुणाला दिसलेच नाहीत.

एका झंजावाताप्रमाणे बरसत राहिली ती.
प्रेमाचा वर्षाव करत.
मुसळधार.
संततधार.


0 Write your comment: